Monday, January 19, 2026

यश आणि अपयश...

यश आणि अपयश 

मानवी जीवन हे यश आणि अपयश यांच्या सततच्या प्रवासाने घडत असते. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यश मिळवायचे असते; परंतु त्या यशाच्या मार्गावर अपयश येणे अटळ असते. यश आणि अपयश ही जीवनाची दोन चाके असून दोन्हींचा समतोल जीवनाला पुढे नेतो.

यश म्हणजे उद्दिष्ट साध्य झाल्याचा आनंद, परिश्रमांना मिळालेले फळ आणि आत्मविश्वासाची वाढ. यश मिळाल्यावर माणूस आनंदी होतो, स्वतःवर विश्वास ठेवू लागतो आणि पुढील ध्येयांसाठी प्रेरित होतो. यशामुळे समाजात मान-सन्मान मिळतो आणि व्यक्तिमत्त्व उजळून निघते. मात्र सतत यशच मिळत राहिले तर माणूस अहंकारी होण्याची शक्यता असते.

अपयश हे अनेकांना नकोसे वाटते; पण खरे पाहता अपयश हे जीवनातील सर्वात मोठे शिक्षक आहे. अपयश माणसाला स्वतःच्या चुका ओळखायला शिकवते, संयम ठेवायला लावते आणि नव्या मार्गाचा शोध घ्यायला प्रवृत्त करते. थॉमस एडिसन, अब्राहम लिंकन, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांसारख्या थोर व्यक्तींनी अनेक अपयशांना सामोरे जाऊनच मोठे यश मिळवले. त्यांच्या जीवनातून हेच शिकायला मिळते की अपयशाने खचून न जाता त्यातून बोध घेतला पाहिजे.

यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार आवश्यक असतात. अपयश आले तरी प्रयत्न सोडू नयेत. “अपयश ही यशाची पहिली पायरी आहे” हे वाक्य याच अर्थाने महत्त्वाचे ठरते.

शेवटी असे म्हणता येईल की यश आपल्याला आनंद देते, तर अपयश आपल्याला घडवते. जीवनात दोन्हींचे स्वागत करणे गरजेचे आहे. कारण अपयशातून शिकून मिळवलेले यश हेच खरे आणि टिकाऊ यश असते. 

रागिणी गौतम 

इयत्ता 6वी 

Wednesday, December 31, 2025

मराठी सुविचार

 जीवनात नेहमी सुविचाराप्रमाणे आचरण केले पाहिजे .सुविचार खाली दिले आहेत .

  • जिथे इच्छाशक्ती मजबूत असते तिथे मार्ग आपोआप तयार होतो.

  • वेळेची किंमत समजणारा माणूसच यशस्वी होतो.

  • हार मानणे सोपे असते, पण पुन्हा प्रयत्न करणे हीच खरी शक्ती आहे.

  • यश मिळवायचं असेल तर अपयशाला स्वीकारा.

  • बदलाची सुरुवात स्वतःपासूनच करावी.

  • स्वतःवर विश्वास ठेवा, जग आपोआप विश्वास ठेवेल.

  • प्रयत्न करणाऱ्यांचा पराभव कधीही होत नाही.

  • ज्ञान हीच खरी संपत्ती आहे.

  • मन जिंकलं की जग जिंकल्यासारखं वाटतं.

  • थोडं थांबा, विचार करा आणि मग निर्णय घ्या.

  • स्वप्नं मोठी असावीत, पण कष्ट त्याहून मोठे असावेत.

  • शब्द लहान असतात पण जखमा मोठ्या करतात.

  • वेळ आणि नाती दोन्ही सांभाळून वापरा.

  • ज्याच्या मनात करुणा असते त्याचे जीवन सुंदर असते.

  • चांगला माणूस होण्यासाठी कोणतंही शिक्षण लागत नाही.

  • जीवन एकदाच मिळतं, ते हसत-खेळत जगा.

  • मैत्री ही मनांची भेट असते, चेहऱ्यांची नाही.

  • चांगुलपणाने जग जिंकता येते.

  • जीवन हे स्पर्धा नाही, ते समजून जगण्याची कला आहे.

  • चूक होणे स्वाभाविक आहे, पण त्यातून शिकणे महत्त्वाचं आहे.

  • छोट्या छोट्या क्षणांत मोठं सुख दडलं असतं.

  • मनाने श्रीमंत असाल तर गरिबी काहीच नाही.

  • आजचा दिवस परत येणार नाही, त्याला सर्वोत्तम बनवा.

  • मेहनत हेच नशीब बदलण्याचं साधन आहे.

  • स्वतःचा आनंद इतरांच्या हातात देवू नका.

  • जे रोखतात तेच कधी कधी पुढे ढकलतात.

  • चुकीला क्षमा करा पण स्वतःला कधीच सोडू नका.

  • प्रयत्न थांबवू नका जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही.

  • वेळ गेला की संधीही जाते.

  • शांत माणूस कधीही हरत नाही.

  • मन मोठं असेल तर घर आपोआप मोठं वाटतं.

  • स्वतःचं मूल्य ओळखा; तुम्ही अनमोल आहात.

  • स्वप्नांवर कधीच पडदा टाकू नका.

  • प्रगती हवी असेल तर शिकत रहा.

  • खरा आनंद देण्यात आहे घेण्यात नाही.

  • नकार मिळाला तरी चालेल, पण प्रयत्न थांबू नयेत.

  • सहनशीलता ही मोठी ताकद आहे.

  • खरा मित्र तिथे असतो जिथे संपूर्ण जग नसतं.

  • नाते टिकवायचं असेल तर अहंकार सोडा.

  • मन मोकळं ठेवा, जग सुंदर वाटेल.

  • समस्या टाळू नका, त्यांचा सामना करा.

  • दुसऱ्यांचं अनुकरण न करता स्वतःचा मार्ग तयार करा.

  • हसणं हे जीवनाचं औषध आहे.

  • शब्द मोफत आहेत पण त्यांची किंमत अमूल्य आहे.

  • आजचा घाम म्हणजे उद्याची कमाई.

  • जे मिळालं त्यात समाधान ठेवा, पण जे हवं त्यासाठी मेहनत करा.

  • स्पर्धा इतरांशी नको, स्वतःशी करा.

  • सूर्य जळतो म्हणूनच जग उजळतं – तसंच तुमचे कष्ट तुमचं भविष्य उजळवतात.

Friday, December 19, 2025

संत गाडगे महाराज..


      

            *स्वच्छतेचे पुजारी*  

          *संत गाडगे महाराज*


  *डेबूजी झिंगराजी जानोरकर*

             (समाज सुधारक)


     *जन्म : 23 फेब्रुवारी 1876*

 (शेणगाव,महाराष्ट्र , ब्रिटिश भारत)


    *निधन : 20 डिसेंबर 1956* 

                (वय 80)

  ( वलगाव, अमरावती , महाराष्ट्र )


मुख्य स्वारस्ये : धर्म , कीर्तन ,    

                      नीतिशास्त्र

प्रभाव : डाॕ. बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील , भाऊराव कृष्णाजी गायकवाड , तुकडोजी महाराज आणि मेहेर बाबा

                     गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.

                 संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.

         गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

                    समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून् सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.

 

👬 *गाडगेबाबा आणि बाबासाहेबांची भेट*

                         14 जुलै 1941 मध्‍ये संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्‍हती. ते मुंबईत होते. ही माहिती एका सहका-याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यापर्यंत पोहोचवली. बाबासाहेब तेव्‍हा कायदेमंत्री होते. त्‍याच दिवशी सायंकाळी कामानिमित्‍त त्‍यांना दिल्‍लीला जायचे होते. पण गाडगेबाबांच्‍या प्रकृतीची बातमी ऐकताच त्‍यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी या बातमी घेऊन येणा-या सहका-यासोबत हॉस्‍पिटलमध्‍ये पाहोचले. गाडगेबाबा कधीही कुणाकडून काही स्‍वीकारत नसत. पण त्‍यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्‍वीकारल्‍या.

गाडगेबाबा तेव्‍हा म्‍हणाले होते, "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."

डॉ. बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

📚 *गाडगे महाराजांची चरित्रे*

  असे होते गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

ओळख गाडगेबाबांची (प्राचार्य रा.तु. भगत)

कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे)

गाडगेबाबा (चरित्र, प्रबोधनकार ठाकरे)

गाडगे बाबांचा पदस्पर्श (केशव बा. वसेकर)

श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन (गो.नी. दांडेकर)

Shri Gadge Maharaj (इंग्रजी, गो.नी. दांडेकर)

गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी)

गाडगे माहात्म्य (काव्यात्मक चरित्र, नारायण वासुदेव गोखले)

गोष्टीरूप गाडगेबाबा (विजया ब्राम्हणकर)

निवडक गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

मुलांचे गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत)

लोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य (डॉ. द.ता. भोसले)

The Wandering Saint (इंग्रजी, वसंत शिरवाडकर)

संत गाडगेबाबा (गिरिजा कीर)

संत गाडगेबाबा (दिलीप सुरवाडे)

संत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

Sant Gadagebaba (इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत)

संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा (प्राचार्य रा.तु. भगत)

श्रीसंत गाडगे महाराज (मधुकर केचे)

श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पां.बा. कवडे, पंढरपूर)

संत श्री गाडगे महाराज (डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर)

गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार)

समतासूर्य गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत )

स्वच्छतासंत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

🎥 *गाडगेबाबांच्या जीवनावरील  चित्रपट*

                डेबू : हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - नीलेश जलमकर

देवकीनंदन गोपाळा : हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - राजदत्त


📖 *साहित्य संमेलन*

               महाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरते.


⏳ *मृत्यू*

                       गाडगे महाराजांचे अमरावती जवळ पेढी नदीच्या काठावर, वडगाव जि. अमरावती 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. 


🏵 *सन्मान* 

                       त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रकल्प २०००-०१ मध्ये सुरू केला. हा कार्यक्रम स्वच्छ गावे सांभाळणार्‍या ग्रामस्थांना बक्षिसे देतो.  याव्यतिरिक्त, भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ स्वच्छता व पाणी यासाठी राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केली.  त्यांच्या सन्मानार्थ अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे.

🏵 *सन्मान*

            भारताच्या टपाल खात्याने त्यांच्या नावावर स्मारक शिक्के जारी करुन गाडगे महाराजांचा गौरव केला होता.


 🙏🌹 *गोपाला... गोपाला... देवकीनंदन गोपाला...* 🌹🙏

        


Sunday, November 16, 2025

श्रमिकांचे महत्व...

 


श्रमिक किंवा कामगार श्रम करून आपआपली उपजीविका चालवितात त्यांना श्रमिक किंवा मजूर म्हणतात. आज जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात श्रमिकांमुळे आपले जीवन सुकर व सोपे झाले आहे. आहे . त्यांना जरी त्यांच्या श्रमाचे मूल्य कमी मिळते पण त्यांचे कार्य फारच महत्वाचे आहे.


श्रमिकांची गरज प्रत्येक ठिकाणी असते. शेतीमध्ये, पशुपालनासाठी लहान-मोठ्या कारखान्यांमध्ये. कारखान्यात मजूर नसले तर काहीच उत्पादन होणार नाही .बांधकाम करणारे सुद्धा मजूरच असतात. कालवे, बांधारे, पुल, रस्ते तयार करण्यासाठी मजूर गुंतलेले असतात. घरातली व समाजातील अनेक लहान-मोठी कामे करण्यासाठी श्रमिक झटत असतात.


मजुरांची स्थिती नेह‌मीच चांगली नसते. गावातल्या व खेड्‌यातल्या मजुरांना  त्यांच्या कामाची मजुरी पुरेशा प्रमाणात मिळत नाही.  मोठ्या शहरात त्यांना मजूरी जास्त मिळते पण येथे जगण्यासाठी त्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतात. शहरातल्या कामगारांना मजुरांना अस्वच्छ वसाहतीत वस्तीत रहावे लागते. आपल्या मुलांना ते चांगले  शिक्षण पण देऊ शकत नाहीत. आजारपणात त्यांना चांगल्या आरोग्याच्या सोयी उपलब्ध होत नाहीत त्यांना इलाजा अभावी  त्रास भोगावा लागतो.


 शासनाने मजुरांच्या कल्याणसाठी काही योजना चालू केल्या आहेत. गावातील मजुरांना गावातच काम मिळेल केली आहे. परंतु इतकेच पुरेसे नाही. सर्व श्रमिकांसाठी घरे , त्यांच्या मुलांचे शिक्षण ,त्यांचे जीवनस्तर उंचावण्यासाठी ठोस कार्यक्रमांची आवश्यकता आहे.  मजुरांच्या श्रमाचा आपण सर्वांनी सन्मान करायला पाहिजे .


 अबोली राम गवळी इयत्ता सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर

Friday, October 10, 2025

खेळाचे महत्त्व

  खेळाचे महत्त्व

खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शरीर तंदुरुस्त, मन प्रसन्न आणि बुद्धी तीक्ष्ण ठेवण्यासाठी खेळ आवश्यक आहेत. “आरोग्य हेच खरे धन” हे आपण सर्वजण जाणतो, आणि हे धन मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमित खेळणे.

खेळामुळे शरीरात उत्साह आणि ताकद निर्माण होते. धावणे, उडी मारणे, बॉल खेळणे, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, फुटबॉल अशा खेळांमुळे शरीरातील सर्व अवयव कार्यरत राहतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मन आनंदी राहते.

खेळ केवळ शरीरासाठीच नव्हे तर मानसिक विकासासाठी देखील महत्त्वाचे असतात. खेळातून सहकार्य, शिस्त, वेळेचे नियोजन, नेतृत्वगुण, सहनशीलता आणि संघभावना शिकता येते. जिंकण्याचा आनंद आणि हार मान्य करण्याची तयारी हे दोन्ही जीवनातील मौल्यवान धडे खेळातून मिळतात.

आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुले बाहेरील खेळ विसरू लागली आहेत. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्यांमध्ये वाढ होत आहे. म्हणूनच पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना खेळासाठी प्रोत्साहन द्यावे.


खेळ हा केवळ विरंगुळा नाही, तर आरोग्य आणि व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे. त्यामुळे दररोज काही वेळ खेळासाठी दिला पाहिजे.

“खेळा – आनंदी रहा, तंदुरुस्त रहा!”  

                                          श्रेयस बर्गे                                          इयत्ता सातवी 

शेतकरी नसता तर. .

 

शेतकरी नसता तर...

शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. तो दिवसरात्र शेतात घाम गाळून आपल्या पोटासाठी अन्न उगवतो. शेतकरी नसता तर आपण पोटभर अन्न खाऊ शकलो असतो का? नाही! म्हणूनच शेतकरी हा खऱ्या अर्थाने अन्नदाता आहे.

शेतकरी नसता तर शेतात पिके उगवली नसती, धान्य, भाजीपाला, फळे, दूध, कापूस काहीच मिळाले नसते. शहरातील लोकांकडे पैसा असता, पण खाण्यासाठी अन्नच नसते. दुकानांत भाजी, धान्य, फळे यांचा तुटवडा निर्माण झाला असता. भुकेमुळे देशात अराजक निर्माण झाले असते.

शेतकरी आपल्या श्रमाने आपले पोट नव्हे, तर संपूर्ण समाजाचे पोट भरतो. उन्हातान्हात, पावसात, थंडीत तो कष्ट करतो. कधी पिकाला रोग येतो, तर कधी दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे त्याचे नुकसान होते, तरीही तो पुन्हा नव्या आशेने शेती करीत राहतो.

आपण शेतकऱ्यांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या मेहनतीचे खरे मूल्य ओळखले पाहिजे. शेती हा व्यवसाय नव्हे, तर जीवनाचे सार आहे.


शेतकरी नसता तर आपले जीवन अशक्य झाले असते. म्हणूनच आपण सारे मिळून म्हणूया —

“शेतकरी हा देशाचा अन्नदाता, त्याच्याविना जीवन अशक्य!”.               

                                   अबोली गवळी 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. 

वृक्षारोपण काळाची गरज

  वृक्षारोपण  काळाची गरज

आजच्या आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवाने अनेक क्षेत्रांत झपाट्याने प्रगती केली आहे. परंतु या प्रगतीच्या शर्यतीत मानवाने निसर्गाचे संतुलन मात्र विसरले आहे. शहरांचे विस्तार, रस्ते, कारखाने आणि घरांच्या वाढत्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड होत आहे. यामुळे पर्यावरण प्रदूषण, दुष्काळ, तापमानवाढ आणि पर्जन्यमानातील अनियमितता वाढली आहे. म्हणूनच आज वृक्षारोपण ही काळाची अत्यंत गरज बनली आहे.

झाडे ही निसर्गाची अनमोल देणगी आहेत. ती आपल्या जीवनाचे मूळ स्त्रोत आहेत. झाडांशिवाय मानवाचे अस्तित्वच अशक्य आहे. झाडे आपल्याला ऑक्सिजन, फळे, फुले, सावली, औषधे, लाकूड आणि इंधन देतात. ते वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन सोडतात आणि हवा शुद्ध ठेवतात. झाडांमुळे पावसाचे प्रमाण वाढते, माती धूप होत नाही, तसेच नद्या व झरे कायम राहतात.

झाडांच्या तोडीमुळे पृथ्वीवरील तापमान वाढत आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ ही समस्या गंभीर बनली आहे. यामुळे हिमनद्या वितळत आहेत, पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचा सर्वात सोपा आणि परिणामकारक मार्ग म्हणजे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे.

प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावावे आणि त्याची जपणूक करावी. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन वृक्षारोपण मोहिमा राबवाव्यात. स्थानिक व जलसंधारणासाठी उपयुक्त झाडांच्या जाती लावाव्यात. फक्त झाडे लावणेच नव्हे तर ती टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.

झाडे आपल्याला केवळ पर्यावरणीय नव्हे तर मानसिक शांतीही देतात. हिरवाईकडे पाहून मन प्रसन्न होते, तणाव कमी होतो. त्यामुळे वृक्षारोपण हे केवळ निसर्गसंवर्धन नाही तर आरोग्य, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे.


आज पृथ्वीचे रक्षण करायचे असेल तर वृक्षारोपणाशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्यासाठी, आपल्या पुढील पिढ्यांसाठी आणि पृथ्वीच्या अस्तित्वासाठी झाडे लावणे व जपणे अत्यावश्यक आहे.

“झाड लावा, झाडे जगवा – पृथ्वी वाचवा, जीवन वाचवा!”


                                                 अबोली राम गवळी 

                              जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर

यश आणि अपयश...

यश आणि अपयश  मानवी जीवन हे यश आणि अपयश यांच्या सततच्या प्रवासाने घडत असते. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यश मिळवायचे असते; परंतु त्या यशाच्या...