खेळाचे महत्त्व
खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शरीर तंदुरुस्त, मन प्रसन्न आणि बुद्धी तीक्ष्ण ठेवण्यासाठी खेळ आवश्यक आहेत. “आरोग्य हेच खरे धन” हे आपण सर्वजण जाणतो, आणि हे धन मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमित खेळणे.
खेळामुळे शरीरात उत्साह आणि ताकद निर्माण होते. धावणे, उडी मारणे, बॉल खेळणे, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, फुटबॉल अशा खेळांमुळे शरीरातील सर्व अवयव कार्यरत राहतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मन आनंदी राहते.
खेळ केवळ शरीरासाठीच नव्हे तर मानसिक विकासासाठी देखील महत्त्वाचे असतात. खेळातून सहकार्य, शिस्त, वेळेचे नियोजन, नेतृत्वगुण, सहनशीलता आणि संघभावना शिकता येते. जिंकण्याचा आनंद आणि हार मान्य करण्याची तयारी हे दोन्ही जीवनातील मौल्यवान धडे खेळातून मिळतात.
आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुले बाहेरील खेळ विसरू लागली आहेत. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्यांमध्ये वाढ होत आहे. म्हणूनच पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना खेळासाठी प्रोत्साहन द्यावे.
खेळ हा केवळ विरंगुळा नाही, तर आरोग्य आणि व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे. त्यामुळे दररोज काही वेळ खेळासाठी दिला पाहिजे.
“खेळा – आनंदी रहा, तंदुरुस्त रहा!”
श्रेयस बर्गे इयत्ता सातवी